Monday 31 January 2022

निवडुंग



निवडुंगासही भावना असतात 
त्यावर काटे असले म्हणुनी काय झाले ?
प्रेम का फक्त गुलाबावरंच करावे !

नसेलही तो गुलाबासारखा अप्रतिम 

पण काटेरी तर गुलाबहीं असतं !
मग निवडुंगाच्या काट्याशीं इतका तिटकारा का ?
त्या संगे मग अबोला का ?

मन तर त्यासही आहे,

बाहेरून सुंदर नसले म्हणून काय झाले ?
अंतर्मन तर दुधाप्रमाणे श्वेत, 
जे जीवनदायी आहे !

गुलाबाचं काय कधीही कोमेजून साथ सोडेल, 

निवडुंग मात्र आयुष्यात कुंपण बनून रक्षा करेल !

कधीतरी काटेरीपणा दुर्लक्षित करून त्याचेही ह्रदय पहा,

एकदा कोणीतरी निवडुंगावरही प्रेम करा !
©हितेश मढवी

Saturday 23 March 2019

चकवा


''चकवा'' हा प्रकार माझ्या पहिल्यांदा कानावर पडला तो म्हणजे २०१६ मधे, निमित्त होते माझ्या सोबत राहणाऱ्या एका मुलाला आलेला अनुभव.
  आम्ही मुंबई मधे काम करणारे मुलं भाड्याने राहतो त्या पैकी हा 'नयन'. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्या कारणाने सर्व मित्र आपापल्या घरी ( अलिबाग ) जात असत, असेच एकदा सुट्टी असल्याने नयन सुध्दा आपली दुचाकी घेऊन दुसऱ्या मित्रासोबत गावी गेला तेव्हा त्या मुलाने त्याला मुंबई अलिबाग मार्गाने जाताना पनवेलच्या पुढे एक कमी वेळेत पोहचता येतो असा पर्यायी मार्ग दाखवला. पुढच्या फेरीस नयन एकटाच गावी निघाला तेव्हा तो बहूदा रस्ता विसरला असे समजून तो आसपासच्या परीसरात आपली दुचाकी घेऊन अलिबागला जाणारा मार्ग शोधत फीरत राहीला, रात्र खूप असल्याने त्या मार्गावर रहदारी नव्हती कारण हा मार्ग क्वचित माणसे वापरत. जो प्रवास तो २ तासात पूर्ण करत असे तोच प्रवास ४ ते ५ तास झाले तरीही अधुराच होता, कधी कधी तर तो जिथून पुढे गेला तिथेच पुन्हा पुन्हा येत असे.
  कालांतराने सकाळी ३ च्या सूमारास त्याला एक व्यक्ती मिळाली आणि योगायोग म्हणजे ती व्यक्ती सुध्दा अलिबागच्या दिशेने जात होती. नयन ने सुटकेचा निश्वास सोडला, एकप्रकारचा योगायोग होता, कारण रात्री ३ ते ४ च्या सूमारास असे कुणी शक्यतो प्रवास करत नाही कारण त्या मार्गाने पहिली गाडी ५ च्या आसपास जाते.
सदर प्रकार त्याच्या सोबत दोनदा घडला आणि हि गोष्ट त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला रात्री गप्पा मारताना सांगितली, तेव्हा एका मित्राने सांगितले की ह्या प्रकारास 'चकवा' असे म्हणतात.
माझ्यासाठी जे काही ऐकले ते विचित्र आणि अविश्वसनीय होते.
हि घटना ऐकून सात दिवस हि झाले नसतील, नयन नेहमीप्रमाणे गावी जात असताना वाशी खाडीपुला जवळ त्याचा अपघात झाला आणि क्षणातच त्याने प्राण त्याग केले.
दुपारी कामावर असताना मित्राचा फोन आला आणि सदर घटना समजली आणि दु:खद धक्का बसला.
हि घटना होऊन ३ वर्षे ओलांडून गेली पण मला आजही प्रश्न पडतो, खरच ! चकवा प्रकार  असतो का.?